Thursday, July 3, 2025

#अभिमानास्पद


#अभिमानास्पद..!

बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं.. 

कारणही तसंच, घरातील 'शांत आणि अभ्यासू' व्यक्ती ने MBA करायचंच हा चंग बांधला होता.. 


खरंच किर्ती, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे..!!

घरातल्या साऱ्या जबाबदाऱ्या, संसार, प्रपंच, काव्या, कुश त्यांची शाळा, अभ्यास.. 

तुझी नोकरी, धावपळ आणि नुसती नोकरी नाही तर WFH च्या जमान्यात, आठवड्यातुन ४ दिवस ऑफिस ला यावंच लागेल ह्या नियमात असलेली नोकरी.. 

हे सर्व काही कमी होतं तर त्यात माझे ऑनसाईट चे २ वर्ष म्हणजे पुन्हा वाढलेल्या जबाबदाऱ्या.. आणि अश्या ह्या आव्हानांना समोरं जाताना एवढं कमी कि काय म्हणून MBA करायचं हे आणखी एक शिवधनुष्य उचलण्याचं आव्हान तू स्विकारलंस, आणि उत्तम निकाल घेऊन ते पूर्ण हि केलंस, खरंच तुझ्या जिद्दीला सलाम..

प्रचंड अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे हि.. 

म्हणजे मागचे ४ सेमिस्टर घरात परीक्षा आली असं कानावर आलं कि विचारावं लागायचं नेमकी कोणाची परीक्षा आली आता.. काव्या, कुश कि किर्ती.. 

असो, गमतीचा भाग सोडला तर तुझ्या ह्या भरगोस यशाबद्दल तुझं अगदी मनभरून अभिनंदन..!!

तुझी मेहनत, सातत्य, जिद्द आणि आत्मविश्वास यामुळेच हे शक्य झालं, एवढं मात्र नक्की.

परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन! 


हे यश तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल ठरेल याची खात्री आम्हा सर्वांना आहेच.

पुढील आयुष्य असेच यशस्वी, आनंदी आणि प्रेरणादायी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

Very Proud of you Dear..!!!

Friday, June 27, 2025

दैव बलवत्तर



खूप दिवसांनी आज लिहावंसं वाटलं.. त्यापेक्षा आज उसंत मिळाली असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही.. 

२ आठवड्यापूर्वी झालेला विमान अपघाताचा प्रसंग टीव्हीवर पहिला, मग त्यात एकच जण कसा वाचला, तसेच एका मुलीची ट्राफिक मध्ये अडकल्याने, उशीर झाल्याने ती फ्लाईट चुकली आणि सुदैवाने तीही ह्या अपघातातून बचावली, हे सर्व पाहत असतानाच मागे आमच्यासोबत घडलेला आणि 'दैव बलवत्तर' ह्या शब्दप्रयोगाला अगदी समर्पक असा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, म्हणून हा लिखाणप्रपंच.. 

तर तारीख होती - २० एप्रिल २०१९, एक अगदी जवळचं लग्न असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय १७ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून कोल्हापूर ला गेलो होतो.. 
लग्न, जेवण आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी पुण्याला परतण्यासाठी आम्ही निघालो, येताना ठरल्याप्रमाणे नृसिंहवाडीला दर्शनासाठी पोहोचलो .. त्याप्रमाणे दर्शन वगैरे घेऊन, आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, एव्हाना दिवस मावळतीकडे सरकला होता.. हायवे ला लागल्यावर भाजीपाला घेऊन जाणारा एक मोठा ट्रक आम्हाला ओव्हरटेक करू पुढे निघून गेला.. भाज्यांनी खचाखच भरलेला असल्याने, आणि तिन्ही बाजूंनी भाज्या दिसत असल्याने तो लक्षात राहील असाच नजारा होता..  
पुढे किणी टोलनाक्यावर वेगवेगळ्या टोल बूथ वर असल्याने पुन्हा आम्ही एकमेकांसोबत शर्यतीत घोडे एका रेषेत उभे असतात त्याप्रमाणे आलो.. पण आमचा नंबर आधी लागला आणि आम्ही पुढे निघालो..तसा तो ट्रक हि विस्मरणात गेला.. मग मजल दरमजल करत आम्ही पुढे जात होतो.. काही प्रवास केल्यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली, जेवण वगैरे आटपून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.. आता मात्र रात्र व्हायला सुरुवात झाली होती, गाडीतील २-३ जण सोडले तर बहुतांश मंडळी निद्रावस्थेत होती.. 
साधारणतः खेड शिवापूर च्या टोलनाक्यावर पोहचायला आम्हाला रात्रीचे १२-१२:१५ वाजले असतील, तसेच आम्ही पुढील प्रवासाला निघालो, अचानक तेवढ्यात तो सुरुवातीला कोल्हापूरच्या अलीकडे दिसलेला, भाज्यांनी खचाखच भरलेला ट्रक आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघाला..आता मात्र आम्ही जवळजवळ पुढे मागेच होतो, साधारण ४०-५० फुटांवर पुढे तो ट्रक भरदाव चालला होता. कधी आम्ही पुढे तर कधी ट्रक असं नित्यनेमाने सुरु होतं, ते चालू असतानाच ट्रक ड्रायवर ने हॉर्न देऊन, लाईट ने अप्पर-डिप्पर देऊन, पुढे जाण्यासाठी विनवणी केली आणि नवले ब्रिज च्या आसपास ट्रक आमच्या पुढे निघाला, आता आम्ही वारजे पुलावरून ट्रक च्या मागे चाललो होतो, तिथून पुढे RMD सिंहगड कॉलेज, वारजे या ठिकाणी पोहचलो होतो, तिथल्या वळणाच्या किंचित अलीकडे आम्ही असू आणि इतक्यात बेंगलोर च्या दिशेने जाणारा, पलीकडच्या बाजूचा साधारण ८०-९० च्या वेगात असणारा एक कंटेनर, चालकाचं नियंत्रण सुटल्याने, डीव्हाडर तोडून आमच्या बाजूला आला आणि आमच्या समोर असणाऱ्या त्या भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक च्या कोड्रायव्हर साईड ला आदळला, तो आघात इतका भयंकर होता कि ट्रक च्या समोरच्या बाजूंचा पूर्ण चकणाचुर झाला होता, कंटेनर तिथेच न थांबता, पुढे आला आणि त्याचा टायर फुटल्याने तो आमच्या बसच्या अगदी शेजारी समांतर येऊन ३-४ हेलकावे घेऊन विरुद्ध दिशेला स्थिर झाला.. 
एव्हाना बसमधील तसेच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड सुरु केली होती.. पण ते ३-४ मिनिटं अंगावर काटा येणे किंवा जीव मुठीत घेऊन बसणे काय असतं हे स्वतः अनुभवलं होतं.. काही कळायच्या आत कंटेनर चा ड्रायवर पसार झाला होता.. समोरच्या भाजीपाला घेऊन जाणारा ट्र्क ड्रायवर जखमी झाला, आणि आमच्या बसचे ड्रायवर काका तर जागेवर टणटण उडत होते.. त्यांनी हा प्रसंग एवढ्या जवळून अनुभवल्यामुळे त्यांचा जीव पुरता घाबरा झाला होता.. त्यांनी गाडी कडेला घेऊन पाणी घेतलं पण त्यांची भीती काही केल्या जात नव्हती, हात थरथर कापत होते.. म्हणजे जणू मरणच समोर पाहिल्यासारखे ते पूर्ण सुन्न अवस्थेत होते, आमची जुनी ओळख असल्याने मला ते चांगलेच परिचित होते तश्याच पूर्ण प्रवासात आमच्या गप्पाही रंगल्या होत्या पण ह्या सगळ्या प्रसंगानंतर त्यांचं अवसान पूर्णपणे गळून गेलं होत, त्यातच ते म्हणाले दादा, बरोबर ३ आठवड्यांनी लेकीचं लग्न आहे ओ माझ्या, एवढं बोलून त्यांच्या अश्रूंचा बांद फुटला, ढसाढसा रडू लागले.. ते सर्व पाहून माझं हि मन सुन्न झालं.. 
नंतर १५-२० मिनिटांनी स्थिरस्थावर होऊन आम्ही निघालो आणि सुखरूप घरी पोहचलो.. 
हा प्रसंग आमच्या स्मरणातून कधीही न जाण्यासारखा.. तेव्हापासूनच मग अनेक प्रश्न मनात घर करून गेलेत.. 

रस्त्यावर इतक्या गाड्या असतात, पण तो भाज्यांचा ट्र्कच आमच्या लक्षात राहिला ?
मागे असणारा तो ट्रक किणी टोलनाक्यावर पुन्हा आमच्या शेजारी आला ?
त्या नंतर पुन्हा बराच मागे असणारा तो ट्रक आम्ही जेवायला थांबून देखील आमच्या आसपासच राहिला ?
इतका वेळ आमच्या मागे असणारा तो ट्रक बरोबर नवले पुलावर आम्हाला हॉर्न आणि लाईटचा पास देऊन, ओव्हरटेक करून पुढे गेला ?
आमच्यावर येणारा तो आघात त्या ट्रक ने स्वतःवर घेतला ?
आमच्या गाडीत असणाऱ्या सद्गृहस्थांची भक्तीमार्गातील सत्कर्म आणि पुण्याई हे संकट टाळून गेली ?

तो ट्रक त्या क्षणाला आमच्या पुढे नसता तर कंटेनर समोर आमची बस असणार होती !! 

असे अनेक निरुत्तरित प्रश्न घेऊन आजही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो, आणि कोणी काहीही म्हणो, प्रत्येकाची आपापली मतमतांतरं असतात पण मी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं कि 'देव आहेच', प्रचंड सकारात्मक दिव्य शक्ती असल्याशिवाय हे असे चमत्कार घडत नाहीत!!
अगदी 'देऊळ बंद' चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच..  

म्हणूनच  "दैव बलवत्तर" म्हणून आम्ही सर्वजण वाचलो..!



Wednesday, March 10, 2021

सायकल वारी : पिंपरी चिंचवड ते दिवेआगार

आम्हा मित्रांनी सायकलिंग करत असताना एक दिवस सहजच ठरवलं कि एखादी चॅलेंजिंग राईड करूया मग समोर आली ती म्हणजे पिंपरी चिंचवड ते दिवेअगार राईड...!!

प्रथम दर्शनी १६० किमी ऐकल्यावर जरा गरगरल्यासारखं झालं पण मग मनाशी ठरवलं कि आपण करू शकतो..

एवढा मोठा टप्पा पार करताना गरज होती ती ह्या मार्गातल्या बारीक सारीक गोष्टींची जस कि किती वेळा नंतर, किती अंतर कापल्या नंतर आपण ब्रेक घेतला पाहिजे, कोणतं अंतर पार पडताना जास्त मेहनत घ्यावी लागेल, आणि कोणत्या वेळेला कुठे असलं पाहिजे,. नाश्ता, जेवण कुठे आणि अश्या बऱ्याच गोष्टी..

ह्या साऱ्या बारकाव्यांचा अतिशय योग्य पद्धतीने अभ्यास करण्यात आमच्या ग्रुप चे लीडर अभिजित आणि हेमंत मग्न झाले.. आणि अगदी दिवसातच ते एक प्लॅन घेऊन हजर झाले..

त्यात वर नमूद केलेल्या सर्व महत्वाच्या बाबींची त्यांनी अतिशय सुयोग्य पद्धतीने मांडणी करून हा प्लॅन नक्कीच Workout होऊ शकतो ह्याचा आत्मविश्वास त्यांनी आमच्यात निर्माण केला..


मग काय...  दिवस ठरला.. १९ फेब्रुवारी.. शिवजयंती.. आणि अगदी वेडात मराठे वीर दौडले ह्या गाण्यानुसार आम्ही जण आपापल्या सायकली घेऊन सज्ज झालो.. पहाटे ३:३० वाजता आम्ही जण (अभिजित काळंगे, हेमंत कदम, राहुल साने, विनीत घुगे आणि विनय मांडगे) रावेत, चिखली आणि शाहूनगर अश्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालो आणि भूमकर चौकात जमा झालो.. आणि तिथून आमचा प्रवास सुरु झाला..

मिट्ट काळोखातून सुरु झालेला तो प्रवास आम्हाला अनुभव देत होता एक वेगळीच दुनिया अनुभवायचा.. कधीही अनुभवलेल्या अश्या सुंदर निसर्गसौंदर्याला अगदी जवळून अनुभवण्याचा..आणि नेहमी ह्या मार्गाने जाताना गाडीतून प्रवास केल्याने कधीच कळलेले चढ उतार त्या वेळी आम्हाला प्रकर्षाने जाणवत होते.. मजल, दरमजल करत मुळशी धरणाच्या बॅकवॉटर ला वळसा घालून आम्ही ताम्हिणी घाटात पोहचलो.. 


जाताना ताम्हिणी घाट उतरायचा ह्या विचाराने मन अगदी आनंदी झालं.. आणि संपूर्ण घाट हा उताराचा असल्याने इतर वेळी असणारा १४-१६ किमी ताशी वेग हा तिप्पट झाला आणि आमचा प्रवास अगदी दुचाकीच्या वेगाने म्हणजेच ४०-५० किमी/तास झाला.. ताम्हिणी घाट उतरल्या उतरल्या आम्ही नाश्ता केला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आणि निजामपूर मार्गे माणगाव ला पोहचलो. आता आम्ही पुरते दमलो होतो..

[फोटोमध्ये - डावीकडून स्वतः -विनय मांडगे, विनीत घुगे, अभिजित काळंगे, हेमंत कदम आणि राहुल साने]

माणगाव मध्ये पोहचल्यावर दमलेलो असलो तरी जणू एक वेगळाच उत्साह आमच्यात संचारला होता.

११६ किमी एवढं मोठं अंतर ठरल्याप्रमाणे पार पडलं ह्याच समाधान प्रत्येकाच्या हावभावातून प्रकर्षाने जाणवत होतं, मग तिथून पुढचा प्रवास सुरु झाला, तो म्हणजे ह्या संपूर्ण प्रवासातला शेवटचा टप्पा - माणगाव ते दिवेआगार..

इतका लांबचा पल्ला गाठल्याने आम्हा सर्वांचाच आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.. त्याच जोरावर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, आणि अगदी दुधात मिठाचा खडा पडावा त्याच प्रमाणे आमच्या आनंदात विरजण पडलं ते म्हणजे समोर दिसणारा मोरब्याचा घाट पाहून, परिस्थिती अशी होती की समोर दिसणारा उंच डोंगर, डोंगरात लांब पर्यंत दिसणारे घाटातील चढ, आणि भर दुपारचं रणरणतं ऊन.. त्यावेळी मात्र हवा भरून, टम्म फुगलेल्या फुग्याला कोणीतरी टाचणी लावावी आणि तो फुगा क्षणार्धात फुटावा तशीच आमची अवस्था झाली.. संपूर्ण घाट आम्हाला पायी सर करायचा होता ते हि भर उन्हात..

आणि त्यात आणखी भर होती ती घाटात एकही सावलीचं ठिकाण नसण्याची.. तो मोरब्याचा घाट सर करता करता मात्र आमची पुरी दमछाक झाली..!

घाट चढून वर आल्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि तिथल्या काकांनी आम्ही सायकल वर इतक्या लांब आलोच कसे आणि तुमचं खरच कौतुक वगैरे वगैरे केलं.. पण ह्या सगळ्या पेक्षा ही आनंद देणारं एक वाक्य त्यांच्या मुखातून आलं आणि ते म्हणजे "झालं आता घाट संपला, आता इथून पुढे कुठंच चढ नाही, आता सगळा उतारच उतार आहे" ह्या एका वाक्याने गेलेला संपूर्ण त्राण पुन्हा आला आणि जणू त्या काकांच्या रूपाने देवचं प्रकट झाल्यासारखं वाटलं..

मग आम्ही तिथून पुढे निघालो आणि आमच्यावर वरूण राजाही प्रसन्न झाला आणि तो देखील आम्हाला चांगला आशीर्वाद देऊन गेला.. म्हणजे ह्या प्रवासात आमच्याकडून पोहणं सोडून बाकी सर्व प्रकारच्या कसरती झाल्या आणि पोहणं राहिल्यानेच आमचं पाचही जणांचं Ironman होण्याचं स्वप्न थोडक्यात अधूरं राहिलं..!

वाटेत अनेक उत्साही लोक आम्हाला Thumbs Up करून प्रोत्साहन देत होते आणि अश्या पद्धतीने आम्हीदेखील मजल दरमजल करत पुढचा प्रवास करत होतो.. अखेर दिवेआगार - किलोमीटर अशी पाटी दिसली आणि दिवेआगार दृष्टीक्षेपात येऊ लागलं आणि मग कुठे जरा हायसं वाटलं.

एव्हाना दिवस पूर्ण मावळला होता, अंधार पडू लागला होता आणि त्यामुळेच शेवटचे - किलोमीटर सुद्धा आता खूप जास्त वाटू लागले.

त्यात आमचे लीडर हेमंत अभिजित पुढे आमचं नेतृत्व करत होते त्यामुळे त्यांचा वेग जास्त होता आणि महत्वाचं म्हणजे आम्ही बुकिंग केलेलं ठिकाण आम्हाला शोधायचं होतं.. त्यावेळी मनात एक विचार येऊन गेला की जर आपण पत्ता चुकलो तर आता पुन्हा परत फिरायची ताकद आणि इच्छा नाही, तेव्हा मिळेल तिथे आजची रात्र काढू आणि उद्या सकाळी हवा तो पत्ता शोधू.. पण सुदैवाने अशी वेळ आमच्यावर आली नाही आणि आमच्या हेमंत रावांनी विजयी घोडदौड करत अचूक ठिकाणी आम्हा सर्वांना पोहचवून विजयी पताका फडकवली.. 

अश्या रीतीने आम्ही, आमच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजेच वाणी काकांच्या "कुलस्वामी" इथे पोहचलो..! आणि मग पहाटे :३० वाजता अंधारात सुरु झालेला प्रवास संध्याकाळी वाजता अंधार पडल्यावर संपला आणि ह्या १३-१४ तासाची क्षणचित्रे डोळ्यासमोरून जात होती, आणि ह्या अद्वितीय अश्या एका अदभुद प्रवासाचे आम्ही साक्षीदार होतो ह्याविचारानेच ऊर अभिमानाने भरून येत होता ..

तिथे पोहचून स्थिरस्थावर झाल्यावर मग बाहेरून लाटांचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत होता, नारळ सुपारीच्या बागा आणि स्थानिकांच्या बोलण्यातला तो कोकणी ठेहराव ऐकल्यावर मग आम्हाला "आपण रूपेरी वाळूत, माडांच्या बनात" आल्याची जाणीव झाली..!



फ्रेश झाल्यावर मग मात्र सगळे जण अगदी लहान असताना शाळेतून आल्यावर हातपाय धुवून जेवायला बसतात त्याचप्रमाणे जेवणाची ऑर्डर देऊन वाट पहात बसले.. तिथेच मग Strava वर पाहिलं आणि 162 किमी अंतर कापून आपण इथपर्यंत पोहचलो ह्या विचाराने सर्वजण भारावून गेलो, मग लगेच आम्ही वाणी काकांचे चिरंजीव ऋषिकेश उर्फ बाळू कडे Wifi चा पासवर्ड मागितला, त्यानेही आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पासवर्ड देता मोबाईल स्वतःकडे घेऊन स्वतः पासवर्ड टाकून दिला, मग काय.. मोठ्या सेलिब्रिटीना जसे सही/ऑटोग्राफ साठी हात पुढे करतात अगदी त्याच पद्धतीने आम्ही सर्वांनी आमचे मोबाईल असलेले हात ऋषिकेश कडे पसरले, आणि प्रत्येकाने मोबाईल मध्ये Wifi चा पासवर्ड टाकून घेतला..



व्हाट्सअप वर स्टेटस वगैरे टाकणं सुरू झालं आणि मग बाकी मित्रपरिवारांचे अभिनंदन आणि कौतुकांचे मेसेज यायला लागले, काही टर उडवणाऱ्या मित्रांनी "गेलाय खरं, आता परत सायकल वर येऊन दाखवा" असं आव्हान दिलं..! काही काळजीवाहू मित्रमैत्रिणींचे काळजी घेण्याचेही मेसेज येत होते, तितक्यात मग बहुप्रतिक्षित अशी सुरमई, पापलेट ची खमंग आणि अतिशय चविष्ट थाळी आली, त्यात तांदळाची भाकरी, पापलेट, सुरमई, रस्सा, भात, चटणी आणि जोडीला अतिशय रुचकर अशी सोलकढी असा बेत.. त्यावर मग आम्ही दणकून ताव मारला.आणि अश्या रीतीने आमच्या सायकल वारीच्या दिवसाची सांगता झाली..!



[पिंपरी चिंचवड ते दिवेआगार सायकल वारीत सहभागी सायकलपटू : डावीकडून - अभिजित काळंगे, विनीत घुगे, विनय मांडगे, राहुल साने आणि हेमंत कदम]

म्हणतात ना काही गोष्टी, काही प्रवास आपल्या मनात खोलवर एक ठसा उमटवून जातात आणि कायमच त्या आठवणी आपल्याला मनसोक्त आनंद देऊन जातात..! त्यातल्याच हा प्रवास - आयुष्यभर स्मरणात राहील असा.. एक नवीन दुनियेची ओळख करून देणारा.. नवीन मित्र जोडणारा, नवीन अनुभव गाठीशी बांधणारा.. सकारात्मक दृष्टिकोन देणारा.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्य मनसोक्त जगण्यासाठी कायमच वेगाने (८०-१०० च्या) पुढे जाता, कधीकधी आजूबाजूच्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेत, संथपणे (१५-२० च्या वेगाने) जाण्यातच मजा आहे, ह्याचा संदेश देणारा..!!

#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...