मित्रांनो,
आशा करतोय कि हि शृंखला तुम्हाला नक्कीच आवडेल...
आणि ही माहिती आवडण्याबरोबरच आपला हा देदीप्यमान इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा आणि आपल्या "स्वराज्य राजधानीच्या" विविध पैलूंचं दर्शन आपल्याला, आपल्या मातृभाषेत घडावं हीच त्यामागची प्रेमळ भावना...
तर आजचा भाग क्र. १ :- रायगडाचा इतिहास व हिरकणी बुरुजाची कहाणी...
रायगडाचं भव्य स्वरूप नुसतं सांगण्यापेक्षा ते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवंच...
समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंचीवर वसलेला आणि १२०० एकर मध्ये विस्तीर्ण असा पसरलेला भव्य असा रायरीचा डोंगर म्हणजे "किल्ले रायगड"
गडाच्या खालून पाहणारा चुकूनही कल्पना करणार नाही कि एवढ्या उंचीवर अश्या डोंगरामध्ये एखादा किल्ला असू शकतो... हे ह्या किल्ल्याच सर्वात मोठं वैशिष्ठ्य ...
आणि ह्याच कारणामुळे महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवण्याचे ठरवले...
महाराजांच्या जीवनात ३ किल्ल्यांचे मोठे योगदान आहे,
त्यात प्रथम किल्ला म्हणजे महाराजांचा जिथे जन्म झाला तो "किल्ले शिवनेरी"..
त्या नंतर महाराजांनी पहिली राजधानी म्हणून ज्या किल्ल्याची निवड केली असा - आणि आज देखील किल्ला पाहताना अंगावर काटा येईल असा म्हणजे "किल्ले राजगड"..
आणि नंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आणि सर्वार्थाने परिपूर्ण असा रायरी चा डोंगर म्हणजेच "किल्ले रायगड"..
इतिहास -
जावळीचे मोरे यांच्या तावडीत असलेला हा रायरीचा डोंगर महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी वेढा घालून जिंकला..
सह्याद्री च्या पर्वतरांगांमध्ये वसलेला अभेद्य असा डोंगर, त्याच बरोबरीने आपल्या इतर किल्ल्याची देखरेख सहज रित्या शक्य असल्याने व त्याचे भौगोलिक महत्व
आणि चढाई करण्ययसाठी अवघडं व सागरी मार्गाने दळणवळण करण्यासाठी देखील सोपे असल्याने महाराजांनी ह्या रायरीच्या डोंगराची निवड स्वराज्याची राजधानी म्हणून करण्याचे ठरवले...
महाराजांनी किल्ला बांधणी साठी निवड केली ती म्हणजे वास्तुविशारद (Architect) हिरुजी इंदुळकर यांची...
महाराजांनी हिरोजींच्या हाती मोहरा दिल्या आणि राजे सुरतेच्या स्वारीवर निघून गेले...
हिरोजींनी किल्ल्याचे बांधकाम १६५६ ला सुरु करून १६७० ला पूर्ण केले. आणि १४ वर्षात हि स्वराज्याची अभेद्य राजधानी दिमाखात उभी केली..
आपण नुसता रायगड फिरायचो म्हणलो तरी आपल्याला पूर्ण गड बघण्यासाठी कमीत कमीत ३ दिवस लागतात..
ह्या रायगडावर एकूण मिळून ३५० इमारती, ११ तलाव, ८४ पाण्याच्या टाक्या आहेत...
ह्यामध्ये महत्वाची ठिकाण म्हणजे अष्टप्रधान कार्यालय, धान्याची कोठारं, राणीवसा, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, अजय विजय बुरुज, टकमक टोक, बाजार पेठ, राज दरबार, नगारखाना, होळी मैदान, बारुदखाना, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी...
गडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत..
पहिला म्हणजे जो आपण सर्वजण निवडतो तो - अर्थातच "रोप वे"
आणि दुसरा म्हणजे जो मूळ जुना मार्ग आहे तो ..
जुन्या मार्गाने गडावर जाण्यासाठी १४३५ पायऱ्या आहेत आणि हे पूर्ण अंतर ३.५ किमी एवढे भरतं....
आपण रोप वे ने ज्या जागेवर जाऊन पोहोचतो ती गडाची मागची बाजू. तिथल्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं म्हणतात...
त्याची देखील एक ऐतिहासिक, रोमांचक कहाणी आहे...
गडाच्या पायथ्याला एक हिरा नावाची महिला राहायची. दैनंदिन उदरनिर्वाहासाठी ती दूध, भाजीपाला वगैरे विकण्यासाठी गडावरील बाजारपेठेत येत असे.
हा तिचा कार्यक्रम नित्याने चालू असायचा.
एक दिवस झालं असं कि सूर्यास्त झाल्यावर नागरखान्यातले ढोल वाजू लागले.. आणि किल्याचे सर्व दरवाजे बंद झाले.
हा गडावरचा नियमच असल्याने द्वारपाल देखील त्यांचे काम चोख पद्धतीने करत होते... मग भलेही समोरची व्यक्ती कोणीही असो...
सूर्यास्त झाल्यावर कोणालाही गडाबाहेर पडणे अशक्य च होते आणि सूर्योदयापर्यंत वाट पाहण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय न्हवता...
हिरा गडावर अडकली.. तिने खूप विनवणी करून देखील कोणी काही ऐकेना... द्वारपालांनी सूर्योदयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आणि हिराची राहण्याची सोय करून दिली..
पण हिराला काही केल्या चैन पडेना, तिला डोळ्यासमोर दिसत होत ते फक्त तीच २ वर्षाचं तान्ह बाळ...
झालं तर मग, हिरा ने मनाशी ठरवलं व निश्चय केला आणि तिच्या तान्ह्या लेकरासाठी तिने गड उतरायचं ठरवलं...
पाहता पाहता हिरा गड उतरली आणि तिच्या लेकराजवळ पोहोचली...
दुसऱ्या दिवशी हि बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी लागोलाग हिरा ला गडावर बोलावणं धाडलं....
हिरा तिच्या तान्ह्या लेकरासहित गडावर हजर झाली... तिने घडलेला सारा प्रकार महाराजांना सांगितला..
महाराजांनी हिराला फक्त एक विनंती केली.
कि, आदल्या दिवशी ज्या प्रमाणे ती गड उतरून गेली त्या प्रमाणे एकदा गड उतरवून दाखवण्यास सांगितले...
त्यावेळी हिरा ने जे उत्तर दिले त्याने सारा दरबार गहिवरून गेला.... हिरा चं उत्तर होत....
"राजे काल जेव्हा मी हा गड उतरून चालले होते, तेव्हा मला माझ्या तान्ह्या लेकराशिवाय बाकी काहीच दिसत न्हवत..
आज मी हा गड उतरू शकत नाही कारण माझं लेकरू माझ्या जवळ आहे आणि उतरण्याचा विचार केला तरी मला समोर दिसतोय तो केवळ हा भयाण डोंगर...."
हिराच्या उत्तराने महाराज देखील स्तब्ध झाले आणि राजांनी हिरा चा साडी चोळी, खणा नारळाने ओटी भरून यथोचित सन्मान केला..
आणि महाराजांच्या लक्षात आलं.. कि काल जसा हिरा ने गड उतरला त्या प्रकारे शत्रू देखील ह्या मार्गाने गडावर दाखल होऊ शकतो.....
राजांनी लागोलाग हिरोजींना बोलवून घेतले आणि हिरा ज्या बुरुजावरून खाली उतरली त्या बुरुजाची डागडुजी करून घेण्यास सांगितले आणि त्याला "हिरकणी बुरुज" हे नाव दिले...
आपण रोप वे ने ज्या जागी जाऊन पोहोचतो, तिथेच आहे हा ऐतिहासिक आणि अजरामर "हिरकणी बुरुज"...!!
क्रमश:
फोटो सौजन्य - गुगल

No comments:
Post a Comment