आम्हा मित्रांनी सायकलिंग करत असताना एक दिवस सहजच ठरवलं कि एखादी चॅलेंजिंग राईड करूया मग समोर आली ती म्हणजे पिंपरी चिंचवड ते दिवेअगार राईड...!!
प्रथम दर्शनी १६० किमी ऐकल्यावर जरा गरगरल्यासारखं झालं पण मग मनाशी ठरवलं कि आपण करू शकतो..
एवढा मोठा टप्पा पार करताना गरज होती ती ह्या मार्गातल्या बारीक सारीक गोष्टींची जस कि किती वेळा नंतर, किती अंतर कापल्या नंतर आपण ब्रेक घेतला पाहिजे, कोणतं अंतर पार पडताना जास्त मेहनत घ्यावी लागेल, आणि कोणत्या वेळेला कुठे असलं पाहिजे,. नाश्ता, जेवण कुठे आणि अश्या बऱ्याच गोष्टी..
ह्या साऱ्या बारकाव्यांचा अतिशय योग्य पद्धतीने अभ्यास करण्यात आमच्या ग्रुप चे लीडर अभिजित आणि हेमंत मग्न झाले.. आणि अगदी ४ दिवसातच ते एक प्लॅन घेऊन हजर झाले..
त्यात वर नमूद केलेल्या सर्व महत्वाच्या बाबींची त्यांनी अतिशय सुयोग्य पद्धतीने मांडणी करून हा प्लॅन नक्कीच Workout होऊ शकतो ह्याचा आत्मविश्वास त्यांनी आमच्यात निर्माण केला..
मग काय... दिवस ठरला.. १९ फेब्रुवारी.. शिवजयंती.. आणि अगदी वेडात मराठे वीर दौडले ७ ह्या गाण्यानुसार आम्ही ५ जण आपापल्या सायकली घेऊन सज्ज झालो.. पहाटे ३:३० वाजता आम्ही ५ जण (अभिजित काळंगे, हेमंत कदम, राहुल साने, विनीत घुगे आणि विनय मांडगे) रावेत, चिखली आणि शाहूनगर अश्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालो आणि भूमकर चौकात जमा झालो.. आणि तिथून आमचा प्रवास सुरु झाला..
मिट्ट काळोखातून सुरु झालेला तो प्रवास आम्हाला अनुभव देत होता एक वेगळीच दुनिया अनुभवायचा.. कधीही न अनुभवलेल्या अश्या सुंदर निसर्गसौंदर्याला अगदी जवळून अनुभवण्याचा..आणि नेहमी ह्या मार्गाने जाताना गाडीतून प्रवास केल्याने कधीच न कळलेले चढ उतार त्या वेळी आम्हाला प्रकर्षाने जाणवत होते.. मजल, दरमजल करत मुळशी धरणाच्या बॅकवॉटर ला वळसा घालून आम्ही ताम्हिणी घाटात पोहचलो..
जाताना ताम्हिणी घाट उतरायचा ह्या विचाराने मन अगदी आनंदी झालं.. आणि संपूर्ण घाट हा उताराचा असल्याने इतर वेळी असणारा १४-१६ किमी ताशी वेग हा तिप्पट झाला आणि आमचा प्रवास अगदी दुचाकीच्या वेगाने म्हणजेच ४०-५० किमी/तास झाला.. ताम्हिणी घाट उतरल्या उतरल्या आम्ही नाश्ता केला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आणि निजामपूर मार्गे माणगाव ला पोहचलो. आता आम्ही पुरते दमलो होतो..
११६ किमी एवढं मोठं अंतर ठरल्याप्रमाणे पार पडलं ह्याच समाधान प्रत्येकाच्या हावभावातून प्रकर्षाने जाणवत होतं, मग तिथून पुढचा प्रवास सुरु झाला, तो म्हणजे ह्या संपूर्ण प्रवासातला शेवटचा टप्पा - माणगाव ते दिवेआगार..
इतका लांबचा पल्ला गाठल्याने आम्हा सर्वांचाच आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.. त्याच जोरावर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, आणि अगदी दुधात मिठाचा खडा पडावा त्याच प्रमाणे आमच्या आनंदात विरजण पडलं ते म्हणजे समोर दिसणारा मोरब्याचा घाट पाहून, परिस्थिती अशी होती की समोर दिसणारा उंच डोंगर, डोंगरात लांब पर्यंत दिसणारे घाटातील चढ, आणि भर दुपारचं रणरणतं ऊन.. त्यावेळी मात्र हवा भरून, टम्म फुगलेल्या फुग्याला कोणीतरी टाचणी लावावी आणि तो फुगा क्षणार्धात फुटावा तशीच आमची अवस्था झाली.. संपूर्ण घाट आम्हाला पायी सर करायचा होता ते हि भर उन्हात..
आणि त्यात आणखी भर होती ती घाटात एकही सावलीचं ठिकाण नसण्याची.. तो मोरब्याचा घाट सर करता करता मात्र आमची पुरी दमछाक झाली..!
घाट चढून वर आल्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि तिथल्या काकांनी आम्ही सायकल वर इतक्या लांब आलोच कसे आणि तुमचं खरच कौतुक वगैरे वगैरे केलं.. पण ह्या सगळ्या पेक्षा ही आनंद देणारं एक वाक्य त्यांच्या मुखातून आलं आणि ते म्हणजे "झालं आता घाट संपला, आता इथून पुढे कुठंच चढ नाही, आता सगळा उतारच उतार आहे" ह्या एका वाक्याने गेलेला संपूर्ण त्राण पुन्हा आला आणि जणू त्या काकांच्या रूपाने देवचं प्रकट झाल्यासारखं वाटलं..
मग आम्ही तिथून पुढे निघालो आणि आमच्यावर वरूण राजाही प्रसन्न झाला आणि तो देखील आम्हाला चांगला आशीर्वाद देऊन गेला.. म्हणजे ह्या प्रवासात आमच्याकडून पोहणं सोडून बाकी सर्व प्रकारच्या कसरती झाल्या आणि पोहणं राहिल्यानेच आमचं पाचही जणांचं Ironman होण्याचं स्वप्न थोडक्यात अधूरं राहिलं..!
वाटेत अनेक उत्साही लोक आम्हाला Thumbs Up करून प्रोत्साहन देत होते आणि अश्या पद्धतीने आम्हीदेखील मजल दरमजल करत पुढचा प्रवास करत होतो.. अखेर दिवेआगार - ६ किलोमीटर अशी पाटी दिसली आणि दिवेआगार दृष्टीक्षेपात येऊ लागलं आणि मग कुठे जरा हायसं वाटलं.
एव्हाना दिवस पूर्ण मावळला होता, अंधार पडू लागला होता आणि त्यामुळेच शेवटचे ५-६ किलोमीटर सुद्धा आता खूप जास्त वाटू लागले.
त्यात आमचे लीडर हेमंत व अभिजित पुढे आमचं नेतृत्व करत होते त्यामुळे त्यांचा वेग जास्त होता आणि महत्वाचं म्हणजे आम्ही बुकिंग केलेलं ठिकाण आम्हाला शोधायचं होतं.. त्यावेळी मनात एक विचार येऊन गेला की जर आपण पत्ता चुकलो तर आता पुन्हा परत फिरायची ताकद आणि इच्छा नाही, तेव्हा मिळेल तिथे आजची रात्र काढू आणि उद्या सकाळी हवा तो पत्ता शोधू.. पण सुदैवाने अशी वेळ आमच्यावर आली नाही आणि आमच्या हेमंत रावांनी विजयी घोडदौड करत अचूक ठिकाणी आम्हा सर्वांना पोहचवून विजयी पताका फडकवली..
अश्या रीतीने आम्ही,
आमच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजेच वाणी काकांच्या "कुलस्वामी"
इथे पोहचलो..! आणि मग पहाटे ३:३० वाजता अंधारात सुरु झालेला प्रवास संध्याकाळी ७ वाजता अंधार पडल्यावर संपला आणि ह्या १३-१४ तासाची क्षणचित्रे डोळ्यासमोरून जात होती, आणि ह्या अद्वितीय अश्या एका अदभुद प्रवासाचे आम्ही साक्षीदार होतो ह्याविचारानेच ऊर अभिमानाने भरून येत होता ..
तिथे पोहचून स्थिरस्थावर झाल्यावर मग बाहेरून लाटांचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत होता, नारळ व सुपारीच्या बागा आणि स्थानिकांच्या बोलण्यातला तो कोकणी ठेहराव ऐकल्यावर मग आम्हाला "आपण रूपेरी वाळूत, माडांच्या बनात" आल्याची जाणीव झाली..!
फ्रेश झाल्यावर मग मात्र सगळे जण अगदी लहान असताना शाळेतून आल्यावर हातपाय धुवून जेवायला बसतात त्याचप्रमाणे जेवणाची ऑर्डर देऊन वाट पहात बसले.. तिथेच मग Strava वर पाहिलं आणि 162 किमी च अंतर कापून आपण इथपर्यंत पोहचलो ह्या विचाराने सर्वजण भारावून गेलो, मग लगेच आम्ही वाणी काकांचे चिरंजीव ऋषिकेश उर्फ बाळू कडे Wifi चा पासवर्ड मागितला, त्यानेही आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पासवर्ड न देता मोबाईल स्वतःकडे घेऊन स्वतः पासवर्ड टाकून दिला, मग काय.. मोठ्या सेलिब्रिटीना जसे सही/ऑटोग्राफ साठी हात पुढे करतात अगदी त्याच पद्धतीने आम्ही सर्वांनी आमचे मोबाईल असलेले हात ऋषिकेश कडे पसरले, आणि प्रत्येकाने मोबाईल मध्ये Wifi चा पासवर्ड टाकून घेतला..
व्हाट्सअप वर स्टेटस वगैरे टाकणं सुरू झालं आणि मग बाकी मित्रपरिवारांचे अभिनंदन आणि कौतुकांचे मेसेज यायला लागले, काही टर उडवणाऱ्या मित्रांनी "गेलाय खरं, आता परत सायकल वर येऊन दाखवा" असं आव्हान दिलं..! काही काळजीवाहू मित्रमैत्रिणींचे काळजी घेण्याचेही मेसेज येत होते, तितक्यात मग बहुप्रतिक्षित अशी सुरमई, पापलेट ची खमंग आणि अतिशय चविष्ट थाळी आली, त्यात तांदळाची भाकरी, पापलेट, सुरमई, रस्सा, भात, चटणी आणि जोडीला अतिशय रुचकर अशी सोलकढी असा बेत.. त्यावर मग आम्ही दणकून ताव मारला.आणि अश्या रीतीने आमच्या सायकल वारीच्या दिवसाची सांगता झाली..!
म्हणतात ना काही गोष्टी, काही प्रवास आपल्या मनात खोलवर एक ठसा उमटवून जातात आणि कायमच त्या आठवणी आपल्याला मनसोक्त आनंद देऊन जातात..! त्यातल्याच हा प्रवास - आयुष्यभर स्मरणात राहील असा.. एक नवीन दुनियेची ओळख करून देणारा.. नवीन मित्र जोडणारा, नवीन अनुभव गाठीशी बांधणारा.. सकारात्मक दृष्टिकोन देणारा.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्य मनसोक्त जगण्यासाठी कायमच वेगाने (८०-१०० च्या) पुढे न जाता, कधीकधी आजूबाजूच्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेत, संथपणे (१५-२० च्या वेगाने) जाण्यातच मजा आहे, ह्याचा संदेश देणारा..!!









