Wednesday, October 10, 2018

स्वराज्याचे वास्तूविशारद - हिरोजी इंदुलकर

हिरोजी इंदुलकर..

आपण सर्वांना हे नाव चांगलच परिचित असेल...

छत्रपती शिवरायांचे बांधकाम विभाग प्रमुख म्हणजे हिरोजी..
महाराजांचे निस्सीम भक्त आणि उत्तम कलाकार म्हणजे हिरोजी..
आजच्या सिव्हिल इंजिनियर ला लाजवणारे बांधकाम कौशल्य म्हणजे हिरोजी...

तर आज जाणून घेऊया हिरोजींबद्दल...

महाराजांनी सुरतेच्या स्वारीवर निघण्याच्या आधी हिरोजींच्या हाती मोहरा दिल्या आणि राजे स्वारीवर निघून गेले...
१६५६ साली हिरोजींनी किल्ल्याचे बांधकाम सुरु केले...  त्यांनी उराशी एकच स्वप्न बाळगल होत, आणि ते म्हणजे महाराजांच्या पराक्रमाला शोभेल अशी भव्यदिव्य राजधानी उभारायची...
झालं तर मग किल्ल्याच्या बांधकामाला झपाट्याने सुरुवात झाली... आणि हा हा म्हणता तब्बल १४ वर्ष बांधकाम करून हि स्वराज्याची अभेद्य राजधानी १६७० ला दिमाखात उभी राहिली..

यात मुख्यत्वे करून अष्टप्रधान कार्यालय, धान्याची कोठारं, राणीवसा, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, अजय विजय बुरुज, टकमक टोक, बाजार पेठ, राज दरबार, वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारा महाल, नगारखाना, होळी मैदान, बारुदखाना, जगदीश्वर मंदिर अश्या अनेक वास्तू हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या...
एकंदर सांगायचं म्हणलं तर रायगडावर ३५० इमारती, ११ तलाव, ८४ पाण्याच्या टाक्या आहेत ..

ह्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून, त्यासाठी परकीय आक्रमणांशी झुंझ देऊन रयतेचं राज्य उभ्या करणाऱ्या छत्रपती शिवरायांची राजधानी देखील महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाला शोभेल अशीच असावी ह्या एकाच उद्धेशाने हिरोजींनी ह्या वास्तूच्या बांधकामावेळी पैश्याची कुठलीही कमतरता भासू नये ह्या साठी आपली वडिलोपार्जित जमीन जुमला, घर सर्व काही विकून हा भव्य दिव्य अभेद्य असा रायरीचा डोंगर - डोळ्यांना दिपवणाऱ्या सौंदर्ययुक्त पण तितकाच राकट, रांगडा असा रायगड १४ वर्षात उभा केला ... 

महाराजांपर्यंत संदेश पोहचला आणि महाराज रायगड पाहण्यासाठी गडावर दाखल झाले..
हिरोजींच्या बांधकाम कौशल्याने सजलेला आणि परिपूर्ण असा रायगड पाहिल्यावर महाराज हिरोजींवर भलतेच खुश झाले..

रायगडाचे वर्णन एका वाक्यात सांगताना हिरोजी सांगतात  ...
"परवानगीविना गडाखालून एकच गोष्ट वर येऊ शकते, ती म्हणजे वारा"
आणि गडावरून एकच गोष्ट खाली जाऊ शकते, ती म्हणजे पाणी"

हे ऐकून आणि सर्वार्थाने परिपूर्ण अश्या रायगडाची भव्यदिव्य कलाकृती पाहून महाराजांनी हिरोजींना बक्षीस, ईनाम म्हणून काहीतरी मागण्याचा आग्रह धरला..
त्यावर हिरोजींनी आदरपूर्वक विनंती केली कि - गडावर असणाऱ्या जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर माझं नाव असावं अशी माझी इच्छा आहे..

या मागचं कारण विचारल्यावर हिरोजींनी त्याच स्पष्टीकरण दिल -

"महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असाल, तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला नक्की याल"
आणि आल्यावर प्रत्येक वेळी तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे"

हे ऐकून हिरोजींची महाराजांप्रती असणारी निस्सीम भक्ती, सेवाभाव पाहून सदरावरील सगळ्यांचाच ऊर भरून आला...
महाराजांनी लागोगाल हिरोजींना परवानगी दिली आणि नुसतीच परवानगी न देता त्यावर खालील मचकूर लिहण्यास सांगितले..

 "सेवेचे ठायी तत्पर.. हिरोजी इंदुलकर "




आपण आज हि जाऊन पाहू शकतो कि, महाराजांच्या समाधी कडून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आपल्याला - हि भक्तीची, निष्ठेची, सेवेची पायरी आजही  आपल्या सगळ्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावून घेत... त्याच जोमात, जोशात आपल्या कौशल्याची आणि महाराजांप्रती असणाऱ्या निस्सीम भक्तीची , सेवाभावाची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही...

अश्या स्वराज्याचे वास्तुविशारद आणि आपल्या कौशल्याने अभेद्य, ताकदवान, आणि रौद्र अशी स्वराज्याची राजधानी घडवणाऱ्या हिरोजींना त्रिवार मुजरा..!! 


No comments:

Post a Comment

#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...