Friday, June 27, 2025

दैव बलवत्तर



खूप दिवसांनी आज लिहावंसं वाटलं.. त्यापेक्षा आज उसंत मिळाली असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही.. 

२ आठवड्यापूर्वी झालेला विमान अपघाताचा प्रसंग टीव्हीवर पहिला, मग त्यात एकच जण कसा वाचला, तसेच एका मुलीची ट्राफिक मध्ये अडकल्याने, उशीर झाल्याने ती फ्लाईट चुकली आणि सुदैवाने तीही ह्या अपघातातून बचावली, हे सर्व पाहत असतानाच मागे आमच्यासोबत घडलेला आणि 'दैव बलवत्तर' ह्या शब्दप्रयोगाला अगदी समर्पक असा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, म्हणून हा लिखाणप्रपंच.. 

तर तारीख होती - २० एप्रिल २०१९, एक अगदी जवळचं लग्न असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय १७ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून कोल्हापूर ला गेलो होतो.. 
लग्न, जेवण आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी पुण्याला परतण्यासाठी आम्ही निघालो, येताना ठरल्याप्रमाणे नृसिंहवाडीला दर्शनासाठी पोहोचलो .. त्याप्रमाणे दर्शन वगैरे घेऊन, आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, एव्हाना दिवस मावळतीकडे सरकला होता.. हायवे ला लागल्यावर भाजीपाला घेऊन जाणारा एक मोठा ट्रक आम्हाला ओव्हरटेक करू पुढे निघून गेला.. भाज्यांनी खचाखच भरलेला असल्याने, आणि तिन्ही बाजूंनी भाज्या दिसत असल्याने तो लक्षात राहील असाच नजारा होता..  
पुढे किणी टोलनाक्यावर वेगवेगळ्या टोल बूथ वर असल्याने पुन्हा आम्ही एकमेकांसोबत शर्यतीत घोडे एका रेषेत उभे असतात त्याप्रमाणे आलो.. पण आमचा नंबर आधी लागला आणि आम्ही पुढे निघालो..तसा तो ट्रक हि विस्मरणात गेला.. मग मजल दरमजल करत आम्ही पुढे जात होतो.. काही प्रवास केल्यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली, जेवण वगैरे आटपून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.. आता मात्र रात्र व्हायला सुरुवात झाली होती, गाडीतील २-३ जण सोडले तर बहुतांश मंडळी निद्रावस्थेत होती.. 
साधारणतः खेड शिवापूर च्या टोलनाक्यावर पोहचायला आम्हाला रात्रीचे १२-१२:१५ वाजले असतील, तसेच आम्ही पुढील प्रवासाला निघालो, अचानक तेवढ्यात तो सुरुवातीला कोल्हापूरच्या अलीकडे दिसलेला, भाज्यांनी खचाखच भरलेला ट्रक आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघाला..आता मात्र आम्ही जवळजवळ पुढे मागेच होतो, साधारण ४०-५० फुटांवर पुढे तो ट्रक भरदाव चालला होता. कधी आम्ही पुढे तर कधी ट्रक असं नित्यनेमाने सुरु होतं, ते चालू असतानाच ट्रक ड्रायवर ने हॉर्न देऊन, लाईट ने अप्पर-डिप्पर देऊन, पुढे जाण्यासाठी विनवणी केली आणि नवले ब्रिज च्या आसपास ट्रक आमच्या पुढे निघाला, आता आम्ही वारजे पुलावरून ट्रक च्या मागे चाललो होतो, तिथून पुढे RMD सिंहगड कॉलेज, वारजे या ठिकाणी पोहचलो होतो, तिथल्या वळणाच्या किंचित अलीकडे आम्ही असू आणि इतक्यात बेंगलोर च्या दिशेने जाणारा, पलीकडच्या बाजूचा साधारण ८०-९० च्या वेगात असणारा एक कंटेनर, चालकाचं नियंत्रण सुटल्याने, डीव्हाडर तोडून आमच्या बाजूला आला आणि आमच्या समोर असणाऱ्या त्या भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक च्या कोड्रायव्हर साईड ला आदळला, तो आघात इतका भयंकर होता कि ट्रक च्या समोरच्या बाजूंचा पूर्ण चकणाचुर झाला होता, कंटेनर तिथेच न थांबता, पुढे आला आणि त्याचा टायर फुटल्याने तो आमच्या बसच्या अगदी शेजारी समांतर येऊन ३-४ हेलकावे घेऊन विरुद्ध दिशेला स्थिर झाला.. 
एव्हाना बसमधील तसेच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड सुरु केली होती.. पण ते ३-४ मिनिटं अंगावर काटा येणे किंवा जीव मुठीत घेऊन बसणे काय असतं हे स्वतः अनुभवलं होतं.. काही कळायच्या आत कंटेनर चा ड्रायवर पसार झाला होता.. समोरच्या भाजीपाला घेऊन जाणारा ट्र्क ड्रायवर जखमी झाला, आणि आमच्या बसचे ड्रायवर काका तर जागेवर टणटण उडत होते.. त्यांनी हा प्रसंग एवढ्या जवळून अनुभवल्यामुळे त्यांचा जीव पुरता घाबरा झाला होता.. त्यांनी गाडी कडेला घेऊन पाणी घेतलं पण त्यांची भीती काही केल्या जात नव्हती, हात थरथर कापत होते.. म्हणजे जणू मरणच समोर पाहिल्यासारखे ते पूर्ण सुन्न अवस्थेत होते, आमची जुनी ओळख असल्याने मला ते चांगलेच परिचित होते तश्याच पूर्ण प्रवासात आमच्या गप्पाही रंगल्या होत्या पण ह्या सगळ्या प्रसंगानंतर त्यांचं अवसान पूर्णपणे गळून गेलं होत, त्यातच ते म्हणाले दादा, बरोबर ३ आठवड्यांनी लेकीचं लग्न आहे ओ माझ्या, एवढं बोलून त्यांच्या अश्रूंचा बांद फुटला, ढसाढसा रडू लागले.. ते सर्व पाहून माझं हि मन सुन्न झालं.. 
नंतर १५-२० मिनिटांनी स्थिरस्थावर होऊन आम्ही निघालो आणि सुखरूप घरी पोहचलो.. 
हा प्रसंग आमच्या स्मरणातून कधीही न जाण्यासारखा.. तेव्हापासूनच मग अनेक प्रश्न मनात घर करून गेलेत.. 

रस्त्यावर इतक्या गाड्या असतात, पण तो भाज्यांचा ट्र्कच आमच्या लक्षात राहिला ?
मागे असणारा तो ट्रक किणी टोलनाक्यावर पुन्हा आमच्या शेजारी आला ?
त्या नंतर पुन्हा बराच मागे असणारा तो ट्रक आम्ही जेवायला थांबून देखील आमच्या आसपासच राहिला ?
इतका वेळ आमच्या मागे असणारा तो ट्रक बरोबर नवले पुलावर आम्हाला हॉर्न आणि लाईटचा पास देऊन, ओव्हरटेक करून पुढे गेला ?
आमच्यावर येणारा तो आघात त्या ट्रक ने स्वतःवर घेतला ?
आमच्या गाडीत असणाऱ्या सद्गृहस्थांची भक्तीमार्गातील सत्कर्म आणि पुण्याई हे संकट टाळून गेली ?

तो ट्रक त्या क्षणाला आमच्या पुढे नसता तर कंटेनर समोर आमची बस असणार होती !! 

असे अनेक निरुत्तरित प्रश्न घेऊन आजही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो, आणि कोणी काहीही म्हणो, प्रत्येकाची आपापली मतमतांतरं असतात पण मी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं कि 'देव आहेच', प्रचंड सकारात्मक दिव्य शक्ती असल्याशिवाय हे असे चमत्कार घडत नाहीत!!
अगदी 'देऊळ बंद' चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच..  

म्हणूनच  "दैव बलवत्तर" म्हणून आम्ही सर्वजण वाचलो..!



5 comments:

  1. 🙌🏻🙌🏻🙌🏻

    ReplyDelete
  2. prasang agadi dolyasamorch aala.. kharach daiva balwattar🙏

    ReplyDelete
  3. खतरनाक अनुभव

    "देव आहेच"....

    ReplyDelete
  4. स्वामींच्या कृपेने तुमच्या वरचा अनर्थ टाळला 🙏✨❤️

    ReplyDelete
  5. Om namah shivay, dev tari tyala kon mari?

    ReplyDelete

#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...